संजय गणोरकर : “सुपात धान्य आहे आणि सुपाबाहेर शेतकऱ्यांची प्रेतं पडली आहेत असं ते शिल्प... त्यातून मला दाखवायचं होतं की, लोकांना धान्य हवंय, पण शेतकरी नकोय.”

हिवाळ्याचे दिवस होते. मोटारसायकलने निघालो होतो. माझ्यापुढे एक रिक्षा होती. त्यातून पांढर्‍या कपड्यात बांधलेल्या प्रेताचं डोकं आणि पाय बाहेर आले होते. बराच वेळ त्या रिक्षाच्या मागे होतो. मी खूप अस्वस्थ झालो. एक क्षण असा की, मला असह्य झालं. मग मी ओव्हरटेक केलं, तेव्हा मला रिक्षात तोंडाला काही न बांधलेले दोन म्हातारे आई-वडील मांडीवर प्रेत घेऊन बसले आहेत आणि रिक्षा चालवणाऱ्यानं तोंड झाकलं असल्याचं दिसलं.......